पाहुण्यांसाठी माहिती

मुंबई ही एक आह्वान देणारी नगरी आहे. ती प्रचंड आहे – तिची लोकसंख्या १२ दशलक्षांच्याही पुढे आहे आणि येणार्‍या पाहुण्यांना चक्रावून टाकणारी तसेच इथल्या बहुतेक रहिवाशांना निराश करणारी, सतत बदलती पायाभूतव्यवस्था असणारी आहे.

तरीही, प्रथमदर्शनी जाणवणार्‍या प्रचंड गोंधळाच्या आत एक जागतिक दर्जाचे आर्थिक केंद्र आहे, परंपरागत वाडयावस्त्यांचा एक अप्रतिम समुच्चय आहे आणि एक प्रचंड वेगाने आधुनिकीकरण होणारे शहर आहे – इथे जगाच्या पाठीवर असलेल्या अनेक शहरांशी स्पर्धा करू शकतील असे दारूचे गुत्ते, मद्यपानगृह, विश्रांतिगृहे आणि उपाहारगृहे आहेत.

विमानतळावरून निघताना तुमच्या इच्छित स्थळी पोचवणारी, आगाऊ पैसे - जास्तीत जास्त ५०० रूपये – भरून मिळणारी टॅक्सी घेणे हे सर्वांत उत्तम. जर तुम्ही आम्ही व्यवस्था केलेल्या कोळीवाडयातील ठिकाणी राहणार असाल तर आम्ही नोंदणी केलेल्या सर्व सहभागींना ई-मेल करून तेथे कसे पोहोचायचे त्याची नेमकी पध्दत कळवू.

संध्याकाळी – सत्रे संपल्यानंतर, तुम्ही जवळच असलेल्या आणि एका छोटयाशा टॅक्सी/रिक्षा प्रवासाच्या अंतरावर असलेल्या वांद्रे(पश्चिम) ह्या नगराचा शोध घेण्याचा प्रयत्न करावा अशी आम्ही शिफारस करतो. वांद्रे आणि जुहू यांच्यामध्ये, दर आठवडयाला बदलत राहणारी उपाहारगृहांची आणि रात्री मजा करण्याच्या स्थळांची एक मालिकाच आहे.
सर्वांत उत्तम मार्ग म्हणजे “टाइम आऊट मुंबई” चा सर्वांत ताजा अंक विकत घेणे आणि नंतर त्यातून तुम्हांला काय हवे आहे ते निवडणे.

जुने ब्रिटिशकालीन शहर दक्षिणेच्या टोकाला आहे आणि तिथे (गर्दीचे तास टाळून) ट्रेनने सी एस टी किंवा चर्चगेट स्टेशनांना पोहोचता येते किंवा टॅक्सीने (सुमारे ४५ मिनिटे ते एक तासात) जाता येते. शहराच्या ह्या विभागाचे प्रमुख आकर्षण म्हणजे ब्रिटिशकालीन वास्तुकला हे आहे. ह्या विभागाने मुंबईचे एका झोपाळलेल्या बेटांच्या वस्तीकडून एका महत्त्वाच्या बंदरात, नंतर यंत्रांच्या साहाय्याने पक्का माल तयार करण्याच्या केंद्रात आणि सर्वांत शेवटी एका महत्त्वाच्या आर्थिक उलाढालीच्या केंद्रात रूपांतर होताना पाहिले आहे आणि ही सर्व केंद्रे एकमेकांत गुंतलेल्या अवस्थेत आजच्या समकालीन शहरी पोतात गुरफटलेली आहेत.

आम्ही शिफारस करतो की तुम्ही ‘चोर बाजारा’ ला अवश्य भेट द्या – जिथे ब्रिटिशकालीन कलापूर्ण चिजांचा जुन्या वस्तूंचा बाजार भरतो, तसेच काळबादेवी, गिरगाव आणि महंमदअली रोड यांच्या आसपास असलेल्या अनेक गडबडगोंगाटाच्या बाजारांनाही भेट द्या. महालक्ष्मीचा धोबीघाट, कामाठीपुर्‍यातली जुनी वेश्यावस्ती आणि त्यांच्या विरूध्द लखलखाटाने, डोळे दिपवून टाकणारे परळच्या मॉल्सचे जग हे सर्व त्या एकाच विभागात एकमेकांच्या शेजारी उभे आहेत आणि त्यांना एकदातरी भेट देण्यास योग्य आहेत.

असं होता होता खरंतर शेवटी तुम्हांला धारावीतल्याच असंख्य गल्लीबोळांच्या आणि कितीतरी जगांच्या भूलभुलैयात हरवून जाणंच आवडेल – आणि त्यासाठी आम्ही तुम्हांला दोष देणार नाही!

हवामान – उष्ण आणि दमट

भारतासाठी लसीकरण :
परदेशी पाहुण्यांनी प्रवासाला सुरूवात करण्यापूर्वी किमान ४ आठवडे तरी योग्य ते लसीकरण करून घेण्याची खबरदारी घ्यावी.

व्हिसा – सर्व आंतरराष्ट्रीय सहभाग्यांनी भारतात येण्यासाठी टूरिस्ट व्हिसा घ्यावो. स्वतःच्या देशातून निघण्यापूर्वी कमीत कमी एक आठवडा आधी त्यासाठी अर्ज करावा.


ही व्हिडिओ सायन स्टेशनबाहेर चित्रित केली आहे. आंतरराष्ट्रीय सहभागी जिथे राहतील, त्या हॉटेलजवळच हे ठिकाण आहे.