नागरी तुफान (अर्बन टायफून) कार्यशाळेची उद्दिष्टे

नागरी तुफान (अर्बन टायफून) कार्यशाळा शहरातील आणि परदेशांतील विद्यार्थी आणि व्यावसायिक ह्यांना कोळीवाड्याच्या आणि त्याच माध्यमातून जगभर पसरलेल्या पर्यायी लोकसमूहांच्या भवितव्याविषयी सखोल साधकबाधक चर्चा करण्यासाठी आमंत्रण करीत आहे.

कोळीवाड्याची महानगरीय, राष्ट्रीय आणि जागतिक संदर्भात ओळख काय आहे याविषयी कार्यशाळेतील सहभागी संशोधन बारकाईने तपास करतील. सहयोग्यांनी कार्यशाळेचा ग्राहक नजरेसमोर ठेवलाच पाहिजे. हा ग्राहक म्हणजे समान समस्यांचा सामना करणारे कोळीवाड्यातील तसेच जगभर पसरलेले इतर लोकसमूह.

धारावीतील लोकसमूहांच्या संपन्न नागरी परंपरा टिकवून धरण्याविषयी शासनात आणि सर्वसामान्य जनतेत जाणीवजागृती निर्माण करण्याचे काम ही कार्यशाळा करील. कोळीवाड्यात आणि धारावीत सक्रिय असलेल्या स्थानिक पुरोगामी गटांच्या राजकीय ताकदीची अधिक चांगली समज निर्माण करण्याच्या दृष्टीनेही प्रयत्न होईल. कोळीवाडा, धारावी आज कशी आहे त्याचे यथातथ्य चित्र हे सहभागी बहुमाध्यमांच्या आणि बहुविधशाखांच्या साहाय्याने उभे करतील. धारावीतल्या कुंभारवाडा आणि कोळीवाड्यासारख्या वस्त्यांमध्ये कोणत्या प्रकारचे फरक आहेत? धारावीत पूर्वीपासून अस्तित्वात असलेली रस्त्यांची आखणी आणि भारतातल्या शहरांमधील नागरी जागेचा पूर्वापार चालत आलेला आकृतिबंध यांच्यात काय संबंध आहे? भारतातल्या नागरी चळवळींच्या इतिहासात लोकसमाज कोणती भूमिका बजावतात?

ह्याशिवाय, ही कार्यशाळा कोळीवाडा आणि धारावीच्या नागरी संकल्पचित्रासाठी पर्यायी प्रस्ताव तयार करील. हे प्रस्ताव इंटरनेटवर प्रकाशित केले जातील आणि जनता त्यांचे मूल्यमापन करील. वस्तीचे स्थानिक स्वरूप आणि संबंधितांचे हित यांचा मुंबईच्या अधिक व्यापक संदर्भात सहभागी विचार करतील. ह्या कार्यशाळेतून जे निष्पन्न होईल त्याचा स्थानिक समाजगटांना आणि प्रगतिशील शासनव्यवस्थेला नवीन तंत्रांची सांगोपांग मांडणी करण्यासाठी, व्यापक मतदारसंघांना कार्यप्रवण करण्यासाठी आणि सहभागी नियोजन अंमलात आणण्यासाठी उपयोग होईल.

नागरी तुफान हा जागतिक संघकार्याचा आणि सहभागी संकल्पचित्राचा एक प्रयोग आहे. कार्यशाळेतील घटकांनी त्यांच्या संशोधनात आणि कामात कोळीवाड्याच्या रहिवाशांना कायम गुंतवून घ्यावे यासाठी त्यांना प्रोत्साहन देण्यात येईल. २२ मार्च २००८ रोजी रात्रभर चालणार्‍या एका कार्यक्रमात सर्व गट त्यांनी तयार केलेले काम जनतेला दाखवतील. कार्यशाळेच्या कार्यकालात सहभागींना एकमेकांशी अनौपचारिकरीत्या गाठीभेटी घेण्यासाठी रात्रीची भोजने, एकत्र निवासव्यवस्था, भेटी (व्हिजिट्स), स्नेहसंमेलने इत्यादि तर्‍हेतर्‍हेचे कार्यक्रम आखण्यात येतील.