मुंबई
राहुल श्रीवास्तव

शतकानुशतके ह्या बंदराच्या शहराचा मूळ भाग असलेली सात बेटे म्हणजे मच्छरांनी बुजबुजलेली आणि खाडयांनी आणि दलदलींनी विभागलेली भूशिरे होती. त्यांच्याकडे फारसं लक्ष देण्यासारखी नसली तरीही टॉलेमीने त्याच्या नकाशांत त्यांना स्थान दिलं होतं आणि प्राचीन ग्रीक लोक त्यांना हेप्टॅनेशिया (शब्दशः, ‘सात बेटे’) म्हणूनच ओळखत होते.

पोर्तुगीज शोधक प्रवासी इथे 1508 मध्ये उतरले. त्यांच्या सागरी मार्गांचे संरक्षण करण्यासाठी पोर्तुगीजांनी ह्या बेटांच्या प्रदेशात भक्कम किल्ले उभारून तटबंद्या मजबूत केल्या; माहीम, सायन (शीव), वांद्रे आणि बसीन ऊर्फ वसई येथे तोफखाना असलेली ठाणी उभारली. साधारण ह्याच सुमारास ह्या प्रदेशाला एक नवं नाव मिळालं – ‘बॉम बइया’ म्हणजे पोर्तुगीजमध्ये ‘चांगला उपसागर’.

सन 1661 मध्ये राजे चार्ल्स दुसरे ह्यांच्या पोर्तुगीज राजकन्या कॅथरीन डी ब्रॅगान्झा हिच्याशी झालेल्या विवाहाच्या वेळी ही बेटे हुंडा म्हणून दिली गेली तेव्हाच ती ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीच्या हातांत आली.

मुंबईच्या आदिम रहिवाशांत मुख्यतः मच्छिमार कोळी, ईस्ट इंडिया कंपनीचे अधिकारी आणि किल्लयांसाठी लागणारी रसद पुरवणारी दुकाने घालायला गुजरातमधून आलेले स्थलांतरित लोक ह्यांचाच समावेश होता. ह्या स्थलांतरितांमध्ये इराणियन झोरास्ट्रियन्स
ह्यांची ‘पारशी’ म्हणून ओळखली जाणारी, स्वदेशाचा त्याग करून इथे आलेली एक जमातही होती जिने मुंबईच्या विकासातील एक प्रभावी व्यापारी आणि राजकीय शक्ती म्हणून भूमिका बजावली.

ह्या शहरातील मुख्य उलाढाल म्हणजे आयात–निर्यातीचे केंद्र हे होतेः हिरे, चहा, कागद, चिनी मातीची भांडी, कच्चे रेशीम, सुती कापड चोपड, काळीमिरी, वनस्पती आणि औषधी सागरी मार्गाने ब्रिटनला पाठवली जात आणि शिसे, पारा, लोकरी कपडे, लोखंडी व धातूंपासून बनवलेले सामान आणि सोन्याचांदीच्या लगडी सागरी मार्गाने इथे येत. ब्रिटिश कंपनीच्या अधिकार्‍यांनी संपूर्ण आशियाभर प्रस्थापित केलेल्या अफूच्या व्यापाराच्या जाळ्याचाही हे शहर म्हणजे एक कुप्रसिध्द भाग होते.

1770 पासून पुढे चीनबरोबर चाललेल्या कापसाच्या व्यापारात वृध्दी झाल्यामुळे मुंबईचा दर्जाही खूपच वाढला. हा व्यापार पुढचे शतकभर चालूच राहिला.

ह्या कालखंडात ह्या शहराने पाहिले की सुरतेहून सतत स्थलांतरित होत आलेल्या व्यापार्‍यांमुळे इथल्या अर्थकारणाची जोमदार वाढ झाली. नंतरच्या काही वर्षांत ही बेटे मुख्य भूमीवरील पारशी जहाजबांधणी करणार्‍यांसमवेत अनेक गुजराती (हिंदू आणि मुसलमान दोन्ही) व्यापार्‍यांना आकर्षित करू लागली. बहुतेक सर्व लोक मुळात पोर्तुगीजांनी बांधलेल्या आणि नंतर ब्रिटिशांनी विकसित केलेल्या, वसाहतीच्या मधोमध असलेल्या एका किल्लयाच्या आत आणि भोवती राहत असत. आज ज्याला ‘फोर्ट’ असे म्हटले जाते तो शहराचा भाग म्हणजे ‘बॉम्बे कॅसल’ म्हणून ऑळखली जाणारी, मूलतः तटबंदीने बंदिस्त अशी वस्ती होती. जसजशी ही वस्ती अधिकाधिक दाट होत गेली आणि रोगांचा प्रादुर्भाव वाढू लागला तसतसे पारश्यांसकट श्रीमंत रहिवासी ह्या बंदिस्त शहरातून बाहेर पडून नवीन वस्त्यांमध्ये स्थलांतर करू लागले, भायखळा, माझगाव आणि मलबार हिलमध्ये बंगले आणि हवेल्यावाडे बांधून राहू लागले.

एकोणिसाव्या शतकापासून पुढे एका बर्‍याच मोठ्या आकाराच्या मध्यमवर्गीय लोकवस्तीचा उदय झाला आणि त्यामुळे फार मोठ्या प्रमाणावर वृत्तपत्रे, शाळा आणि कॉलेजे यांची मागणी वाढली. या नवीन प्रसारमाध्यमांना आणि कॉलेजांना मुख्यतः गुजराती व्यापार्‍यांची आणि दुकानदारांची मुले, पोर्तुगीजांमुळे निर्माण झालेल्या स्थानिक ख्रिश्चनांची प्रजा आणि इथे राहणार्‍या महाराष्ट्रीय जमाती यांचा आश्रय होता. काळबादेवी, गिरगाव, गोवालिया टॅंक, महमदअली रोड, ठाकुरद्वार आणि वाळकेश्वर अशा नवीन वसाहतींमधून मध्यमवर्गीयांची उपनगरे वसवली गेली.

एकोणिसाव्या शतकाच्या मध्यावर शेतं, माडांच्या राया, आणि वसाहतवादी ठशाच्या प्रचंड मोठ्या इमारती तसंच सर्व प्रकारच्या लोकांची वस्ती असलेल्या छोट्या छोट्या वसाहती आणि निद्रिस्त, झोपाळलेली खेडी यांनी बनलेल्या 170 चौरस मैलांच्या रमणीय भूप्रदेशातून एका आधुनिक शहराचा पाया रचला गेला.

1860च्या दशकात ब्रिटिशांनी इथल्या मूळ स्थानिक लोकांना वास्तुबांधणीच्या एका पद्धतशीर कार्यक्रमातून असं जाणवून द्यायला सुरुवात केली की ते आता इथे कायमचेच राहायला आलेले आहेत.

त्यातूनच त्यांनी प्रचंड आकाराच्या वास्तूंची बांधणी सुरू केली. व्हिक्टोरिया टर्मिनस, प्रिंस ऑफ वेल्स म्यूझियम, राजाबाई टॉवर, मुंबई विद्यापीठ, जनरल पोस्ट ऑफिस, ओल्ड कस्टम्स हाऊस, एल्फिन्स्टन कॉलेज, पब्लिक वर्क्स डिपार्टमेंट बिल्डिंग – या सर्वांची निर्मिती 1860 च्या दशकात सुरू झाली. आणि या शहराला जाचणार्‍या अनेक समस्या असूनही ब्रिटिश वसाहतवाद्यांच्या वैशिष्ट्यपूर्ण अतिशयोक्तीमध्ये या शहराचे वर्णन ‘भारतातले प्रथम क्रमांकाचे शहर’ – अर्बस् प्रिमा इन इंडिस् असे करण्यात येऊ लागले.

मुंबई शहरातून होणार्‍या व्यापारात कापसाने आता सर्वांत महत्वाचे स्थान मिळवले. गुजरातमधला कच्चा कापूस ब्रिटनमधील लॅंकेशायरमध्ये सागरी मार्गाने पाठवला जात असे, तेथे त्याच्यावर प्रक्रिया करून कापड विणले जात असे आणि नंतर ते मुंबईमार्गे भारतीय बाजारपेठांत पुनर्विक्रीसाठी पुन्हा एकदा सागरी मार्गाने परत पाठवले जात असे.

1870 पर्यंत सुमारे 13 कापडगिरण्या शहरात सुरू झाल्या होत्या. कच्च्या कापसाची समुद्रमार्गे निर्यात हाच अजूनही शहराच्या अर्थकारणाचा प्रमुख स्रोत होता, आणि जेव्हा 1861 मध्ये अमेरिकन स्वातंत्र्ययुध्द सुरू झाले तेव्हा त्याला प्रचंड उत्तेजन मिळाले.

जसजशा कापडगिरण्या वाढू लागल्या तसतशी फार झपाटयाने मुंबईची लोकसंख्याही वाढत गेली, कारण गिरण्यांच्या मागांवर काम करण्यासाठी हजारो महाराष्ट्रीय शहरात येऊन थडकले. गिरण्यांच्या सभोवार उभ्या राहिलेल्या चाळींमध्ये ते राहू लागले. स्थानिक बोलीभाषेत ह्या वस्त्यांना ‘ गिरणगाव’ – ‘गिरण्यांचे गाव’ – असे संबोधण्यात येई. हे एक चैतन्यमय सांस्कृतिक ठिकाण होते आणि त्यातून मराठी आणि गुजराती लेखक, कवी आणि नाटककारांच्या अनेक पिढया जन्माला आल्या. जसजसा शहराचा विस्तार होऊ लागला तसतशी भराव घालून अधिकाधिक जमीन निर्माण करण्यात आली आणि अधिकाधिक रस्ते, बेटांना जोडणारे बांध आणि बोटीचे धक्के बांधण्यात आले.

मुंबई नगरी तिच्या आद्यकालापासूनच नेहमीच, युरोपियन लोक आणि भारतीय उपखंडातील भारतीय लोक यांनी बनलेली एक सळसळणारी, भिन्न प्रकृतीची नगरी झालेली होती. एकोणिसाव्या शतकापर्यंत ह्या समाजांमध्ये जरी एक अस्वस्थपणे जपलेला एकोपा नांदत होता तरी त्यांचा अलगपणा दर्शविणार्‍या रेषा ठळकपणे ओढल्या गेल्या होत्या.

विसाव्या शतकाच्या सुरुवातीला, मुख्यतः 1915 मध्ये महात्मा गांधींचे दक्षिण आफ्रिकेतून पुनरागमन झाल्यापासून मुंबई हे राजकारण शिजायला अतिशय अनुकूल असे ठिकाण बनले होते. स्थानिक लोकांना, नागरिकांना कार्यप्रवृत्त करायला गांधींनी गिरगावातल्या मणिभवनमध्येच तर सुरुवात केली होती. शहरातील व्यापारी, उद्योजक, कामगार आणि व्यावसायिकांपैकी अनेकजण त्यांचे अनुयायी भक्त बनले.

1913 मध्ये दादासाहेब फाळके यांनी ‘राजा हरिश्चंद्र’ हा पहिला पूर्ण लांबीचा चित्रपट बनवला. त्यानंतर सातच वर्षांत देशात एक व्यवस्थित चालणारा चित्रपट-उद्योग अस्तित्वात आला आणि मुंबई ही त्याचा मुख्य घटक बनली.

स्वातंत्र्यानंतर ही नगरी माहीम आणि वांद्रे या तोपर्यंत पोर्तुगीज ठसा असलेल्या वस्त्यांच्या पसीकडे विस्तारत गेली आणि आज आपण ज्याला ‘शहर’ असे म्हणतो त्या रूपात ‘सालशेत’ या भूप्रदेशाचाही समावेश केला गेला. याप्रमाणे शहरात मानखुर्द, मुलुंड आणि दहिसरपर्यंतची सर्व जमीन समाविष्ट केली गेली. त्यावेळच्या समकालीन गुजरात आणि महाराष्ट्राचा समावेश असलेल्या ‘मुंबई राज्या’ ची मुंबई ही राजधानी राहिली.

साठीच्या दशकाने साम्यवादी (कम्युनिस्ट) विचारसरणीने गिरणगावातील कामगारवर्गावर प्रभाव टाकलेला पाहिला आणि शहराच्या राजकीय अस्मितेवर परिणाम करताना पाहिला ज्यामुळे शहराचे राजकीय चित्र अत्यंत चैतन्यमय झाले होते. अनेक भाषांतील वृत्तपत्रे आणि प्रकाशने भरभराटीला आली. पण तेवढ्यातच संयुक्त महाराष्ट्र आंदोलनातून (गुजरात आणि महाराष्ट्र वेगवेगळे करावे अशी मागणी करणारी चळवळ) फुटून निघालेला एक गट इथल्या स्थानिक लोकांची चळवळ असे रूप घेऊन उभा राहिला – ही शिवसेना – जिने मुंबईचे राजकारण पूर्वी बर्‍याच काळात कुणी बदलले नसेल इतके ढवळून काढले.

देशात झालेल्या आर्थिक उदारीकरणाच्या प्रक्रियेनंतर आता या नगरीने एकोणिसाव्या शतकाने तिला जो आकार दिला आणि रुपडे बहाल केले त्याच्या आतापर्यंत टिकवलेल्या स्वत्वाशी मिळतेजुळते असे स्वरूप घेऊन स्वतःला एका वैश्विक महानगरीमध्ये रूपांतरित करून घेतले आहे. मात्र तिच्या खेड्यांची प्रचंड मोठ्या झोपडपट्ट्यांच्या रूपातील वस्त्यांत अवनती झाली आहे आणि या वस्त्यांत गरीब लोक कसेबसे जगण्याची धडपड करीत आहेत. दूरदूर पसरलेल्या उपनगरांतील छोट्या छोट्या सदनिकांतून मध्यमवर्ग चेचला गेला आहे आणि इथले धनिक श्रीमंत शहरातल्या नवीन सुखसोयीयुक्त आरामदायक विलासी संकुलांतून राहत आहेत.

(जेरी पिंटो आणि राहुल श्रीवास्तव यांनी तरुणांसाठी लिहिलेल्या आगामी पुस्तकातून संकलित केलेला मजकूर)