कोळीवाडा (धारावी)
राहुल श्रीवास्तव आणि मतियास एखानोव्ह

कोळीवाडा याचा शब्दशः अर्थ म्हणजे कोळी लोकांचे वसतिस्थान. कोळी हा मासेमारी करणार्‍यांचा समाज आहे आणि ते अरबी समुद्राच्या काठावरील त्या सात बेटांवर राहत असत ज्यांच्यामधून अंतिमतः मुंबईची निर्मिती झाली. ह्या संपूर्ण शहरभर अनेक कोळीवाडे विखुरलेले आहेत.

सतराव्या शतकात अरबी समुद्रावरील ‘बॉम्बाईम’ ह्या पोर्तुगीज अंमलाखालील बंदराचा ब्रिटिशांनी ताबा घेण्याच्या खूप आधीपासूनच धारावी – कोळीवाडा हे माहीमच्या खाडीवरील एक सुस्थापित खेडे होते.

धारावी हे नाव त्या काळापासूनच चालत आलेले आहे असा दावा केला जातो. मराठीत ‘धारेवरचा भाग’ म्हणजे “खाडीचा काठ” असा अर्थ होतो. अरबी समुद्रावरून आत आलेले कोळी हेच धारावी आणि मुंबईचे मूळ रहिवासी होत असे बर्‍याचदा म्हटले जाते.

जसजशी वर्षे सरत गेली तसतशी, परंतु विशेषतः गेल्या चार दशकांत नजरेत भरण्यासारख्या गतीने कोळीवाडयाच्या भोवतालची दलदलीची जमीन भारतातून सर्व बाजूंनी आलेल्या हजारो स्थलांतरितांनी व्यापून टाकली आणि त्यांनी धारावीचे खेडे हेच आपले घर बनवून टाकले. मुंबई शहर आपल्या गरीबातल्या गरीब नागरिकांना कधीच सामावून घेऊ शकले नाही आणि मग धारावीसारख्या खेडयांनाच ह्या वेगवेगळ्या समाजांना सामावून घेण्याखेरीज गत्यंतर उरले नाही. धारावीत येऊन, शून्यापासून सुरुवात करून, काहीही पायाभूत सुविधा उपलब्ध नसलेल्या अतिशय कठीण परिस्थितीला तोंड देऊन वर आलेल्या लोकांच्या असंख्य गोष्टी धारावीत ऐकायला मिळतात.

परिणामी, वाढत चाललेल्या महानगराने कोळीवाडा–धारावीचे खेडे गिळंकृत केले आणि खुद्द धारावीची खाडीही आटून गेली. १९५० च्या दशकात खाडीच्या काठाच्याजागी प्रचंड रहदारीचा धारावी क्रॉस रोड अस्तित्वात आला.

अशा परिस्थितीत अनेक कोळ्यांनी तेव्हाही स्वतःचा उदरनिर्वाहाचा धंदा चालूच ठेवला आणि आजही चालू ठेवला आहे, आणि आजही कोळीवाडा तिथल्या ताज्या मासळीच्या बाजारासाठी प्रसिध्द आहे.

महाराष्ट्र शासन, खाजगी भांडवलदार, विकासक आणि स्वयंसेवी संस्था ज्याच्यात गुंतले आहेत अशा मुंबईच्या स्थावर मालमत्तेच्या उन्मादातही कोळीवाडयाचे रहिवासी आपला स्व-निर्णयाचा हक्क शाबूत ठेवण्यासाठी लढा देत आहेत. त्यांना त्यांच्या जमिनीवरचा ताबा कायम ठेवायचा आहे आणि ते आता धारावी पुनर्विकास योजनेत कोळीवाडाही समाविष्ट करून घेण्याच्या शासनाच्या प्रयत्नाला कायदेशीर आह्वान देत आहेत.

कोळी असा दावा करीत आहेत की महाराष्ट्र शासन अस्तित्वात येण्याच्या कितीतरी आधीपासून, सुमारे ४५० वर्षांपासून ते ह्या जमिनीवर राहत आहेत. जर ते अनधिकृत रहिवासी असतील तर मग भारतातली एकूणएक खेडी ही देखील अनधिकृत रहिवाशांच्या वसाहतीच गणली गेली पाहिजेत. सुदैवाने, ह्या समाजाकडे त्यांचा दावा सिध्द करणारी अनेक कागदपत्रे आहेत ज्यांच्यांत ब्रिटिश सर्व्हेअर्सनी तयार केलेल्या प्राचीन नकाशांचा समावेश आहे.

कोळीवाडयात जन्मलेले आणि सध्या शासनाच्या कस्टम्स ब्यूरोमध्ये कार्यरत असलेले श्री. रवींद्र केणी हे ह्या समाजाला अधिकृत मान्यता मिळावी म्हणून जी तळागाळातली चळवळ चालू आहे त्याचे नेतृत्व करणार्‍या अनेक प्रतिनिधींपैकी एक आहेत. ह्या वस्तीचा पुनर्विकास व्हावा अशी त्यांची इच्छा आहे कारण ६८ सदस्य असलेले त्यांचे एकत्र कुटुंब एका शंभर वर्षे जुन्या घरात राहत आहे आणि साहजिकच त्रासदायक होईल अशा पध्दतीने जागा तोकडी पडत आहे. डी आर पी च्या सध्या अस्तित्वात असलेल्या अटींप्रमाणे – ज्या अशा खास बाबींचा विचार करू शकत नाहीत – त्यांच्या संपूर्ण कुटुंबाला फक्त एकच २२५ चौरस फुटांची सदनिका मिळू शकेल.

कोळीवाडयाची स्वाभाविक रचना ही खरोखर आजदेखील बरीचशी एखाद्या खेडयासारखीच आहे जिथे अनेक सुटीसुटी जुनी घरे उभी आहेत आणि छोटीछोटी फरसबंद अंगणे आहेत. धारावीमध्ये कोळीवाडयाचे अस्तित्व खरोखरच वैशिष्टयपूर्ण आहे आणि झोपडपट्टी कशी दिसावी याचे आपल्या डोळ्यांसमोर जे काल्पनिक चित्र उभे राहते त्याच्याशी ह्याचा कुठेच ताळमेळ बसत नाही.

असे जरी असले तरी ऐतिहीसिक वारशाचे जतन करण्यात ह्या समाजाला खास रस असेल असे काही दिसत नाही. भविष्यकाळ हा टोलेजंग इमारतींनी बनलेला असेल ही कल्पना अनेक रहिवाशांच्या मनात इतकी घर करून बसलेली आहे की ह्या लोकवस्तीचे आजचे स्वरूप टिकवून ठेवण्याची इच्छा असलेल्या आर्किटेक्टस् आणि नगररचनातज्ज्ञांना रुचणारी, कमी उंचीच्या आणि अधिक दाटीवाटीच्या वस्तीची पर्यायी योजना त्यांच्या नजरेसमोरही येऊ शकत नाही. परंतु त्याचवेळी, पुनर्विकासाच्या पर्यायी योजनांची चाचणी करायला हा समाज राजी आहे असेही दिसते.

पुनर्विकासाची कोणतीही योजना राबवायला आर्थिक पाठबळ हे फ्लॅट्स आणि व्यापारी जागा विकूनच उभे करावे लागेल. कोळीवाडयाला तर एका शाळेची, एका समाजोपयोगी जागेची आणि खेळाच्या मैदानाचीही गरज आहे. पुनर्विकासाची प्रक्रिया आपल्या हातांत घेण्यामागे ह्या समाजाला अशी आशा आहे की सध्याच्या एस आर ए स्कीममधून उत्पन्न होणारा, पैशाच्या किंवा जागेच्या रूपातला नफा हा विकासक आणि शासन यांच्यामध्येच वाटला न जाता त्यांच्या हातात राहील.

स्थावर मालमत्तेच्या कंत्राटदारांनी आणलेली, काचेच्या आणि पोलादाच्या उंच इमारती आणि पोहण्याचे तलाव दाखवणारी चकचकीत पुस्तके सध्या कोळीवाडा–धारावी असोसिएशनच्या ऑफिसात एकावर एक रचली जात आहेत. जणू काही ह्याची आठवण करून देण्यासाठीच की ही एकाकाळी दूरवर एकाकी वसलेली कोळीमच्छिमारांची वस्ती आज एका सोन्याच्या खाणीवर बसलेली आहे. टी-जंक्शनच्या काठावर मोक्याच्या ठिकाणी वसलेला कोळीवाडा हा आज धारावीच्या स्थावर मालमत्तेतल्या सर्वाधिक आकर्षक तुकडयांपैकी एक आहे. परंतु एका नव्या नंदनवनाचे स्वप्न दाखवणार्‍या सर्वांत पहिल्या विकासकाच्या योजनेत उडी घालण्याची ह्या समाजाला तितकीशी निकड वाटत नाही. ह्या मच्छिमारांच्या वसाहतीने वर्षानुवर्षे स्वतंत्रतेची एक तीव्र भावना जपलेली आहे आणि ती आजही तशीच शाबूत आहे. शतकानुशतके त्यांनी बस्तान बसवलेल्या ह्या जागेत आजही हा समाज आपली पाळेमुळे घट्ट रोवून उभा आहे.

दुर्दैवाने, धारावीतले बहुतेक समाज ते ज्या जागेवर राहत आहेत त्या जागेवर आपला मालकी हक्क सांगू शकत नाहीत. शासनाचा इथल्या ७० टक्के जमिनीवर मालकी हक्क आहे आणि इथल्या झोपडीधारकांना ती निव्वळ फुकट देण्याची त्याला इच्छा नाही असे दिसते कारण झोपडपट्टीवासीय म्हणजे जणू काही बेकायदेशीर अतिक्रमण करणारे आणि चोर आहेत अशीच वागणूक त्यांना दिली जाते आणि धारावीच्या बाहेर राहणार्‍या बहुसंख्य लोकांनाही हा दृष्टिकोन मान्य असावा असे दिसते. धारावीचे कोळी जो कायदेशीर आणि इतिहासावर आधारित लढा देत आहेत त्यात विजय मिळाल्यास धारावीत राहणार्‍या इतर जातीजमातींनाही कालचक्र फिरवण्यास मदत होईल आणि त्यांना दीर्घकाळ राहण्याचा हक्क प्राप्त करण्यास तसेच पुनर्विकासाच्या प्रक्रियेचे लाभ मिळण्यासही मदत करील. सरतेशेवटी धारावी–कोळीवाडयाचा विजय हा संपूर्ण धारावीचाच विजय असेल

 

संदर्भ:

Marie-Caroline Saglio-Yatzimirsky, Untouchable Bombay, Le bidonville des travailleurs du cuir, CNRS Editions, Paris, 2002

Kalpana Sharma, Rediscovering Dharavi: Stories from Asia’s largest slum, Penguin Books India, 2000