कोळीवाडा, मुंबई येथे नागरी तुफान (अर्बन टायफून) कार्यशाळा, मार्च १६ – २३
सहभागी नागरी संरचना आणि पर्यायी समूहांचे भवितव्य

अर्बन टायफून वर्कशॉपमध्ये धारावी कोळीवाडयाचे रहिवासी आणि जगभरातील कलावंत, आर्किटेक्टस्, चळवळीतील कार्यकर्ते तसेच विचारवंत एकत्र आले होते. सर्वांनी मिळून नवीन कल्पनांचे सर्जन करावे, दूरदृष्टीच्या योजना आखाव्या आणि इतिहासाचे लेखन करून दस्तऐवज निर्माण करावा म्हणून त्यांना एकत्र आणले होते. ह्या कार्यशाळेचा तत्त्वविचार अशा कल्पनेवर आधारित आहे की समाजसमूहांना त्यांचे भवितव्य कसे असावे हे ठरविण्याची मोकळीक असावी आणि प्रत्येकाला, मग त्याचे वय, भाषा किंवा वैयक्तिक अर्हता कोणतीही असो, ह्या प्रक्रियेत भाग घेण्याची संधी मिळाली पाहिजे.

ह्या कार्यशाळेतून निर्माण झालेले साहित्य ‘धारावी.ऑर्ग ह्या विकीबेस्ड वेबसाईटवर अपलोड केले जात आहे, ज्यामध्ये कोणीही लॉगइन करू शकतो आणि स्वतःचे विचार मांडू शकतो. ही वेबसाईट कार्यशाळेच्या काही आठवडे आधी सुरू केली गेली होती आणि सध्या ती प्रचंड वेगाने विकसित होत आहे, जवळजवळ दरदिवशी तिच्यात नवीन माहिती, तपशील यांची भर घातली जात आहे. तिची सुरुवात झाल्यापासून एका महिन्यामध्ये जवळजवळ १०,००० व्यक्तींनी तिला भेट दिली होती आणि १०० व्यक्तींनी नवीन भर घातल्याची नोंद केली होती. तिचे मराठी रूपांतर येऊ घातले आहे.

ही वेबसाईट अर्बन टायफूनच्या सहभागींना एकत्र जोडण्याचे काम करते आणि प्रत्येकाला ह्या कार्यशाळेदरम्यान सुरू केलेल्या कामाचा पाठपुरावा करण्यास मदत करते. आम्ही आपणा सर्वांना धारावी.ऑर्ग वरील अर्बन टायफून पेजेसना भेट देण्यास तसेच आपली प्रतिक्रिया नोंदवण्यास निमंत्रण देत आहोत.

ही साईट लवकरच DOT 01 ह्या धारावीतील अनेक प्रस्तावित संपर्ककेंद्रांपैकी पहिल्या संपर्ककेंद्राशी जोडली जाईल. ह्याची उभारणी चालू आहे. त्यामध्ये मुख्यतः धारावीच्या कोळीवाडयाचे तरुण रहिवासी गुंतलेले आहेत. त्यांनी कार्यशाळेतही सहभाग घेतला आणि समाजाला कार्यशाळेत सहभागी करण्यासाठी अतिशय महत्त्वाची कामगिरी बजावली.

सध्या ते स्वतःचे लेखन आणि चित्रे धारावी.ऑर्गवर अपलोड करीत आहेत आणि ते ह्या संपर्ककेंद्राचा आणि वेबसाईटचा उपयोग त्यांच्या आजूबाजूच्या विशाल वस्तीशी आधिक विस्तृतपणे तसेच आधिक जवळिकीने जोडून घेण्याचा तसेच त्यांचा आवाज दूरवर ऐकला जावा ह्याचा प्रयत्न करण्याचा एक मार्ग म्हणून करीत आहेत.

धारावी.ऑर्ग आणि DOT 01 हे दोन्ही अर्बन टायफून कार्यशाळेमधून निर्माण झालेले अतिशय महत्त्वाचे उपक्रम आहेत. त्यांच्यामागील संकल्पना अशी आहे की प्रत्येक व्यक्ती आणि प्रत्येक ठिकाण हे लक्षात घेण्यासारख्या नकाशावरील एक बिंदू आहे.

DOT 01 आणि इतर DOT 02, 03 … असे नंतर येणारे उपक्रम हे धारावी.ऑर्ग या नावातील “.” चे प्रतिनिधित्व करतात; जो एक छोटासा बिंदू आहे ज्याकडे सर्वसाधारणपणे दुर्लक्ष केले जाते पण खरे पाहता जो सर्वांना एकत्र आणतो, म्हणूनच हे बिंदू म्हणजे इथला समाज आणि बाहेरील विश्व यांना जोडणारे दुवे आहेत.