धारावी
केटिया सावचुक आणि मतियास एखानोव्ह


‘आशियातील सर्वांत मोठी झोपडपट्टी’ म्हणून नेहमीच उल्लेखली जाणारी धारावी म्हणजे खरं तर भारताची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईच्या अक्षरशः ह्दयस्थानी वसलेले, अनेक मूलतः अनौपचारिक वस्त्यांचे, ह्रदयाच्या आकाराचे एक कडबोळे आहे. फार पूर्वी धारावी ही शहराच्या सीमेवर असलेली एक दूरस्थ वस्ती होती, परंतु मुंबईच्या उत्तरदिशेला वेगाने होणार्‍या विस्तारामुळे आता तिचे स्थान बांद्रा – कुर्ला कॉम्प्लेक्स ह्या नवीन आर्थिक आणि व्यापारी केंद्रस्थानाच्या आणि शहराच्या नाडया असलेल्या दोन मुख्य उपनगरीय रेल्वे लायनींच्या मध्ये असल्यामुळे अतिशय महत्त्वाचे बनले आहे.

ह्या भौगोलिक परिस्थितीच्या फायद्यांमुळे तसेच मुंबईत विकासयोग्य जमिनीच्या तौलनिक अभावामुळे त्या दोन्हींचा समन्वय होऊन धारावी आज कोटयवधी डॉलर्स मूल्य असण्याची शक्यता असलेली अत्यंत महत्तवाची स्थावर मालमत्ता आहे आणि त्यामुळे तिच्यावर पुनर्विकास करण्याचा दबाव वाढत चालला आहे.

भौगोलिक क्षेत्र

सुमारे २२३ हेक्टर (५३५ एकर) क्षेत्रफळ जमिनीवर पसरलेली धारावी म्हणजे सायन, माहीम आणि माटुंगा रेल्वे स्टेशने आणि शहराचे पूर्वेकडील आणि पश्चिमेकडील भाग जोडणारे दोन प्रमुख रस्ते (सायन आणि माहीम लिंक रोड) यांनी सीमित असे वाहतुकीचे केंद्र आहे.

धारावी हे सुमारे पाच ते दहा लाख (लोकसंख्येच्या गणनेचे नजीकच्या भूतकाळातील किंवा विश्वसनीय आकडे उपलब्ध नाहीत) लोकांचे वसतिस्थान आहे. नॅशनल स्लम डेव्हलपर्स फेडरेशन (एन एस डी एफ) ने १९८६ मध्ये केलेल्या एका सर्वेक्षणानुसार ८०,५१८ घरांमध्ये ५३०,२२५ लोक (१०६,०४५ कुटुंबे) राहत असल्याचे मोजले गेले; हे आकडे त्यानंतर निश्चितच खूप वाढले असणार.

सर्वांना माहीत असलेल्या, ह्या झोपडपट्टीतील घरांच्या एकाला एक चिकटून असलेल्या छपरांच्या, आकाशातून काढलेल्या छायाचित्रांतील प्रतिमांमधून सिध्द होते की धारावी ही एक अतिशय दाट लोकवस्ती आहे. कमला रहेजा विद्यानिधी इन्स्टिटयूट ऑफ आर्किटेक्चर (के आर व्ही आय ए) यांनी नुकत्याच केलेल्या एका सर्वेक्षणात असे सिधद झाले आहे की धारावीतील एका मध्यवर्ती भागात (चमडा बझार) लोकवस्ती इतकी दाट होती की प्रत्येक चौरस किलोमीटरमध्ये ३३६,६४३ लोक राहत होते! जर लोकसंख्या अंदाजे ७००,००० धरली तर धारावीतील लोकवस्तीच्या दाटीवाटीचे प्रमाण जवळपास ३१४,८८७ प्रति चौरस किलोमीटर होईल. हे सबंध मुंबईच्या दाटीवाटीच्या प्रमाणापेक्षा ११ पटीने जास्त आहे (मुंबई ही जगातील सर्वांत जास्त दाट लोकवस्ती असलेली नगरी आहे कारण इथे २९,५०० लोक प्रति चौरस किलोमीटरमध्ये राहतात) आणि दिवसा मॅनहॅटनमध्ये (५०,००० लोक प्रति चौरस किलोमीटर) असलेल्या दाटीवाटीपेक्षा सुमारे ६ पट जास्त आहे.

इतिहास आणि ओळख

माहीमच्या खाडीच्या काठावर राहणार्‍या कोळी ह्या परंपरागत मच्छिमारी करणार्‍या जमातीचे धारावी हे दलदलीने व खाजण जमिनीने व्यापलेले मूळ वसतिस्थान होते. जसजशा मुंबईला आकार देणार्‍या सात बेटांना विभागणार्‍या दलदली भराव टाकून बुजवण्यात आल्या तसतसे संपूर्ण भारतातून आलेले स्थलांतरित लोक धारावीत स्थायिक झाले. गुजरातमधून आलेले कुंभार, तमिळनाडूमधून आलेले ढोर (चामडे कमविणारे) आणि उत्तर प्रदेशातून आलेले कशिदाकारागीर हे एकोणिसाव्या शतकात धारावीत येऊन सर्वांत आधी बस्तान बसविणार्‍यापैकी काही होते. येणार्‍या स्थलांतरितांना धारावी काम आणि परवडेल असा निवारा देऊ करीत होती; अगदी आताआतापर्यंत प्राधिकार्‍यांच्या दृष्टीने हे एक असे ठिकाण होते की जिथे मूळ शहरापासून दूरवर, अवैध बेकायदेशीर वस्त्या कितीही फोफावू शकत होत्या आणि त्यांना मान्यताही मिळू शकत होती.

आज, धारावी जवळजवळ १०० वैशिष्टयपूर्ण नगरांनी किंवा वस्त्यांनी मिळून बनलेली आहे. ही नगरे म्हणजे प्रादेशिक भाषिक, धार्मिक, जाती आणि जमातींच्या तसेच वर्णांच्या विशिष्ट ओळखी असणार्‍या वस्त्यांचे तुकडयातुकडयांनी बनलेले नक्षीकाम आहे. यातील सर्वांत मोठया वस्त्या ह्या तामिळ आणि महाराष्ट्रीय आहेत. यांपैकी प्रत्येक समाज हा एकूण लोकवस्तीच्या एक तृतीयांश आहे. मात्र धारावीमध्ये भारतातील एकूणएक प्रदेशांचे प्रतिनिधी आहेत आणि स्थलातरितांची नवीन लाट ही बिहारमधून आलेली आहे. धारावी हे हिंदू, मुसलमान, ख्रिश्चन, बौध्द आणि इतर ह्या सर्वांचे घर आहे आणि १९९२-९३ च्या जातीय दंग्यांचा लक्षणीय अपवाद वगळला तर हे सर्व एकमेकांच्या शेजारी एकोप्याने आणि बहुतांशी शांततेने राहत आले आहेत. धारावीच्या रहिवाशांत दलित (पूर्वीचे अस्पृश्य) बहुसंख्येने आहेत, परंतु इतर अनेक जातींचे आणि जमातींचे सदस्यही इथे आलेले आहेत. धारावी हे केवळ शहरातल्या गरीबांचेच नाही तर इतरत्र परवडणारा निवारा न मिळू शकणार्‍या काही मध्यमवर्गीय व्यावसायिकांचेही घर आहे.

अर्थ व्यवस्था

धारावी हे केवळ राहण्याचेच ठिकाण नाही तर ते या शहरातील प्रचंड मोठया अनौपचारिक व्यवसायक्षेत्राचे प्रतिनिधित्व करणारे एक महत्त्वाचे आर्थिक केंद्रही आहे. धारावीत चालणार्‍या व्यापारी उद्योगांमध्ये पुनर्निर्मिती (रीसायकलिंग) उद्योग, चामडे कमविण्याचे कारखाने, अवजड धातूकाम, लाकूडकाम आणि कपडे, पादत्राणे, प्रवासाचे सामान, दागदागिने अशा पक्क्या मालाचे उत्पादन करणार्‍या उद्योगांचा समावेश होतो. ह्या उद्योगधंद्यांचा माल सर्वसाधारणपणे संपूर्ण मुंबईला पुरविला जातो आणि इथली कित्येक उत्पादने तर जागतिक बाजारपेठांतूनही वितरित केली जातात. एका अंदाजानुसार धारावीत उत्पादन केलेल्या वस्तूंची वार्षिक किंमत जवळपास ५०० दशलक्ष अमेरिकन डॉलर्स इतकी होते (“ इनसाईड द स्लम्स” , “ द इकॉनॉमिस्ट”, २७/ १/ २००५).

व्यापारी आणि पक्का माल बनवणारे उद्योग धारावीच्या लोकवस्तीतील एका मोठया हिश्शाला तसेच धारावी बाहेर राहणार्‍या काही जणांना काम पुरवतात. धारावीची बरीच मोठी उत्पादनक्षमता ज्या विकेंद्रित उत्पादन प्रक्रियेवर आधारित आहे ती धारावीच्या घराघरातून चालविण्यात येणार्‍या छोटयाछोटया उत्पादनकेंद्रांच्या एका खूप मोठया जाळ्यावर अवलंबून आहे.

जमीन आणि घरबांधणी

धारावीतील बहुतांश जमीन बृहन्मुंबई म्युनिसिपल कॉर्पोरेशनच्या मालकीची आहे आणि उरलेली, खाजगी जमीनमालक आणि केंद्रसरकार यांच्या ताब्यात आहे. स्थावर मालमत्तेची एक अनौपचारिक बाजारपेठ ह्या भागात अस्तित्वात आहे आणि स्थळानुसार तसेच बांधकामाच्या दर्जानुसार किंमती कमीजास्त होतात. जरी काही रहिवासी पत्र्याच्या भिंती आणि प्लॅस्टिकशीटच्या छपरांनी बांधलेल्या वास्तूंमध्ये राहतात तरी अनेकजण विटा किंवा कॉंन्क्रीटचा वापर करण्याइततपत पुढे गेलेले आहेत आणि त्यांनी माळे चढविले आहेत, वरचे मजले बांधले आहेत आणि शोभेच्या वस्तूंची भर घातली आहे. काही मालकांनी भाडेकरूंना जागा भाडेतत्वावर दिली आहे कारण एकतर त्यांनी एकापेक्षा जास्त जागा खरेदी केल्या आहेत किंवा ते धारावी सोडून इतरत्र राहायला गेले आहेत. धारावीतील बांधकामांच्या संख्येत जरी ‘ झोपडया’ बहुसंख्येने असल्या तरी धारावीत घरांचे इतर प्रकारही समाविष्ट आहेत ज्यांमध्ये कोळीवाडयातील पूर्वीच्या खेडयांच्या पध्दतीची घरे, सरकारने योजनापूर्वक उभारलेल्या चाळी आणि संक्रमणशिबिरे आणि शासनाच्या मदतीने उभ्या राहिलेल्या टोलेजंग इमारती यांचाही समावेश आहे.

***

ज्यांनी कधीही धारावीत पाऊल टाकलेले नाही अशा लोकांना वाटत असेल की ही तंबूंसारखी तात्पुरती उभारलेली बांधकामे असलेली एक उजाड जागा असावी, किंवा बाकीच्या सार्‍या जगाशी पूर्णतः संबंध तुटलेल्या अशा कुपोषित, भिकेवर जगणार्‍या आणि अर्थव्यवस्था मागे नेणार्‍या माणसांनी बुजबुजलेले एक प्रचंड मोठे भंगाराचे आवार असावे.

पन्हाळीच्या पत्र्यांच्या छपरांच्या समुद्राखाली असलेले वास्तव मात्र ह्याहून बरेच वेगळे आहे. धारावी ही एक अतिशय प्रगत अशी नागरी वस्ती आहे जिच्यात वैशिष्टयपूर्ण लोकवस्त्यांचा अंतर्भाव आहे आणि तिथे चालू असलेली आर्थिक उलढाल ही महानगरीय, प्रादेशिक आणि जागतिक स्तरांवर सामाजिक, आर्थिक आणि सांस्कृतिक दृष्टया जोडली गेलेली आहे.


धारावीचा विकास

पूर्वीचे प्रयत्न

पूर्वी अधिकार्‍यांकडून दुर्लक्षिली गेलेली धारावी १९७६ मध्ये जेव्हा शासनाचे झोपडपट्टीविषयक धोरण झोपडया नेस्तनाबूत करण्याऐवजी त्यांची प्रत वाढविण्याकडे वळले तेव्हा अधिकृतरीत्या झोपडपट्टी म्हणून ओळखली जाऊ लागली. त्यानंतरच्या दशकात शासनाने गुन्हेगारी आणि बेकायदेशीर दारूउत्पादनाविरुध्द कारवाई केली आणि पाण्याचे नळ, शौचालये, गटारे आणि वीज अशा मूलभूत सुविधांची तरतूद केली.

पंतप्रधान राजीव गांधी यांनी १९८५ मध्ये जेव्हा धारावीला भेट दिली तेव्हा त्यांनी मुंबईसाठी १०० कोटी रुपयांचे अनुदान जाहीर केले आणि त्यातूनच ‘ प्राइम मिनिस्टर्स ग्रँट प्रोजेक्ट’ (पी एम जी पी) च्या माध्यमातून धारावीतील पायाभूत सुविधा आणि घरबांधणी योजनांसाठी ह्या रकमेचा एक मोठा हिस्सा बाजूला काढून ठेवण्यात आला.

१९९५ मध्ये सुरू झालेल्या झोपडपट्टी पुनर्विकास योजनेमुळे (“ स्लम रीहॅबिलिटेशन स्कीम” – एस आर एस) विकासकांना प्रोत्साहन मिळत आहे की त्यांनी घरबांधणीच्या हक्कांच्या बदल्यात झोपडीवासीयांना २२५ चौरस फुटांची घरे मोफत मिळतील अशी घरे बांधावीत आणि “ ट्रान्सफर ऑफ डेव्हलपमेंट राइटस्” (टी डी आर) मधून मिळालेल्या हक्कांची खुल्या बाजारात विक्री करावी. सध्या धारावीच्या क्षितिजावर एकमेकींना खेटून असलेल्या बहुतेक टोलेजंग इमारती ह्या योजनेतूनच गेल्या आहेत.

शतकामधली सुवर्णसंधी – पण कोणासाठी?

जमिनीच्या वाढणार्‍या किंमतींच्या संदर्भात धारावीचा पुनर्विकास करण्याची सर्वांत ताजी योजना दहा वर्षांपूर्वी अमेरिकेत राहणारे आर्किटेक्ट आणि कन्सल्टंट मुकेश मेहता यांनी तपशीलवार मांडली होती आणि ती महाराष्ट्र राज्याच्या शासनाने २००४ मध्ये संमत केली होती. “धारावी रीडेव्हलपमेंट प्रोजेक्ट” (डी आर पी) ह्या नावाने ती ओळखली जाते आणि “स्लम रीहॅबिलिटेशन ऑथॉरिटी” (एस आर ए) च्या देखरेखीखाली चालवली जाते. ही योजना म्हणजे सर्वांसाठी जणू कल्पवृक्षच आहे असे चित्र रंगवले जाते कारण तिच्यात लाभास लायक झोपडीवासीयांना सुरक्षित निवारा आणि इतर सोयी मिळतील तर मध्यमवर्गीयांना नवीन घरे आणि व्यापारी जागा उपलब्ध होतील, विकासक आणि शासन यांना नफा होईल आणि “जागतिक दर्जाचे शहर” म्हणून मान्यता मिळविण्याची आकांक्षा बाळगणार्‍या शहराच्या भूप्रदेशावरून एक लाजिरवाणा कलंक निपटून टाकता येईल.

९३ अब्ज रुपये (जवळजवळ २.३ दशकोटी अमेरिकन डॉलर्स) मूल्य असलेली ही योजना – जिचे अधिकार्‍यांनी “शतकातील सुवर्णसंधी” म्हणून नामकरण केले आहे – धारावीचे पाच विभाग पाडील आणि एका अटीतटीच्या स्पर्धात्मक लिलावाच्या नंतर जागतिक कंपन्या त्यांचा विकास करतील. मोठया आकाराच्या विकासकामाच्या विक्रीतून होणार्‍या नफ्यातून लायक झोपडवासी (जे त्यांचा रहिवास १ जानेवारी १९९५ पूर्वीपासून होता ह्याचा पुरावा देऊ शकतील) यांचे अनेक मजली इमारतींमधील २२५ चौरस फुटांच्या मोफत सदनिकांमधून पुनर्वसन करण्यासाठी निधी उभा करण्यात येईल. विकासकांवर काही सुविधा पुरविण्याची तसेच पायाभूत सोयींमध्ये सुधारण करण्याची जबाबदारीही टाकली जाईल. जानेवारी २००८ मध्ये एस आर ए च्या अधिकार्‍यांनी २६ पैकी १९ जणांची एक छोटी यादी जाहीर केली. ऑगस्ट २००७ मध्ये निविदा मागवल्यानंतर ह्या २६ लिलाव बोलणार्‍यांनी त्यांना ह्यात रस आहे असे जाहीर करणारे कागदपत्र सादर केले होते. ह्या निवडलेल्या कंपन्या, ज्यांच्यांत भारतातील खूप मोठमोठे स्थावर मालमत्ता विकासक आणि बर्‍याच जागतिक कंपन्या यांचा समावेश आहे, ४५ दिवसांत त्यांच्या आर्थिक बोली प्रस्तुत करतील.

जरी अनेकजण ही योजना तुकडयातुकडयांनी काम करण्याच्या मानसिकतेच्या पलीकडे जाते म्हणून तिचे कौतुक करतात तरी ही योजना रहिवासी–सन्मुख असण्याऐवजी विकासक–सन्मुख असल्याबद्दल; इथल्या समाजाची संमती घेणे किंवा त्यांच्याशी चर्चा करणे ह्याबद्यल पारदर्शित्व न बाळगता पुढे जाण्याबद्दल; आणि पिढयानपिढया हळूहळू स्वतःची प्रगती करून घेत धारावीने आज एकमेवाद्वितीय आणि उत्पादनक्षम स्थान म्हणून स्वतः घडवून घेतले आहे त्याकडे दुर्लक्ष करून ‘टॅब्युला रसा’ (तक्तेवारीवर अवलंबून राहणारा) दृष्टिकोन स्वीकारल्याबद्दल तिच्यावर टीकाही केली जाते.

त्यापुढे जाऊन रहिवाशांनी आणखी असा विरोध दर्शविला आहे की ही योजना त्यांच्यापैकी अनेकजणांचे उदरनिर्वाहाचे साधन हिरावून घेईल, आत्ताच्या राहत्या घरांच्या क्षेत्रफळाच्या संदर्भात त्यांनी पुरेशी जागा देऊ करत नाही आणि धारावीत भाडयाने राहणार्‍यांच्या तसेच नव्याने नुकतेच स्थलांतरित होऊन आलेल्यांच्या फार मोठया लोकवस्तीची दखल घेत नाही.

तज्ज्ञ लोकांनी अणखी असेही धोक्याचे इशारे दिले आहेत की ही योजना आधार देण्यात अशक्य होईल एवढे लोकवस्तीच्या दाटीवाटीचे प्रमाण वाढवण्यास मदत करीत आहे, भविष्यात किती वाढ होईल किंवा पर्यावरणावर कोणते परिणाम होतील यांचा पुरेसा विचार करीत नाही आणि धारावीला संपूर्ण मुंबईबरोबर परिणामकारकरीत्या एकात्म करात नाही.

इतर काही जणांनी असेही ठासून म्हटले आहे की प्रश्न सुलभ करण्याच्या दृष्टीने वेगवेगळे विभाग निर्माण करणे किंवा व्यवसाय अलगअलग करणे म्हणजे धारावाच्या आर्थिक उद्योगांमध्ये, सामाजिक संबंधांच्या जाळ्यांमध्ये आणि तिच्या शहरी व्यक्तिमत्त्वामध्ये एकमेकांत खोलवर रुजलेले जे संबंध आहेत त्यांच्याकडे दुर्लक्ष करण्यासारखे होत आहे.

ह्या योजनेवर होणारी आणखी एक टीका म्हणजे धारावीच्या लोकसंख्येसंबंधी विश्वसनीय अशी संख्यात्मक माहिती न घेताच ती पुढे रेटली जात आहे. ह्या टीकेला उत्तर म्हणून सप्टेंबर २००७ मध्ये शासनाने ह्या प्रदेशाचे मूलभूत स्तरावरील एक सामाजिक–आर्थिक सर्वेक्षण सुरू केले; एका स्वयंसेवी संस्थेकडून चालविले जाणारे आणि थोडयाफार प्रमाणात झोपडपट्टीवासीयांनी कार्यवाहीत आणलेले हे सर्वेक्षण सध्या सुरू आहे.