मुंबईतील कोळीवाड्याचा संदर्भ

धारावीचा कोळीवाडा ही पारंपरिक कोळ्यांची वस्ती आहे. धारावी ही आशियातील सर्वात मोठया अनौपचारिक वसाहतींपैकी एक आहे. हे एक अतिशय विविधांगी असे निवासी, व्यापारी आणि औद्योगिक क्षेत्र आहे जिथे दाट लोकवस्ती आहे. गेल्या शतकात मुंबईने अनुभवलेल्या शहरी आणि लोकसंख्येच्या नाट्यमय बदलांतूनही कोळीवाड्याचे खेडयासारखे स्वरूप टिकून राहिले आहे. भारतीय उपखंड अनुभवत असलेल्या अतिशय वेगवान आर्थिक प्रगतीचे, शहरीकरणाचे, खेडयातून शहराकडे स्थलांतराचे आणि सध्याच्या कालखंडात घडून येणार्‍या परिवर्तनाचे मुंबई - मॅक्झिमम सिटी - हे प्रतीक आहे. मुंबई हे भारतातील सर्वांत मोठे शहर तर आहेच, शिवाय आर्थिक आणि व्यापारी राजधानीही आहे आणि जागतिक पातळीवरील स्थावर मालमत्तेत गुंतवणूक करणार्‍यांना आकर्षित करणारे ते प्रभावी चुंबकही झाले आहे.

मुंबईच्या परिघावरील दलदलींवर, खाजण जमिनींवर धारावी वसविण्यात आली होती. देशाच्या सर्व भागांतून येणार्‍या स्थलांतरितांसाठी फार पूर्वीपासून शहरात प्रवेश करण्याचा हा पहिला टप्पा राहिला आहे. ही २२३ हेक्टरांची, कमीतकमी ५ लाख लोकांचे वसतिस्थान असलेली वसाहत आज बृहन्मुंबईच्या मध्यभागी आली आहे. मुंबईच्या नवीन आर्थिक केंद्रस्थानापासून - बांद्रा–कुर्ला कॉम्प्लेक्सपासून - हाकेच्या अंतरावर असल्यामुळे मालमत्तेच्या हिशेबात धारावीची अंदाजित किंमत जवळपास २० अब्ज अमेरिकन डॉलर्स इतकी आहे.

नुकताच मुंबईच्या महानगर–शासनाने (धारावी पुनर्विकास योजना) ही जमीन खाजगी विकासकांना विकण्याचा प्रयत्न केला. वस्तीत राहणार्‍या लोकांना या निर्णयप्रक्रियेपासून संपूर्णपणे बाजूला ठेवल्यामुळे ही प्रक्रिया लोकशाहीविरोधी आहे असा तीव्र विरोध करण्यात आला - जरी बर्‍याच काळापासून इथे राहणार्‍या रहिवाशांचे योग्य ठिकाणी पुनर्वसन करण्याचे आश्वासन देण्यात आले तरीही. धारावी पुनर्विकास योजनेतील मुख्य त्रुटी ही आहे की ती मुळातच धारावीचा – प्रत्यक्ष क्षेत्रफळाचा, लोकसंख्येचा, सामाजिक किंवा आर्थिक बाबींचा – कोणत्याही तर्‍हेचा ठाशीव अभ्यास करून त्यावर आधारलेली नाही. शासन आता ह्या त्रुटीचे निराकरण करण्याचा प्रयत्न करीत आहे. धारावीचे सर्व रहिवासी आणि अंतिमतः भारतातील सर्व झोपडपट्टीवासी यांच्या जिव्हाळ्याच्या प्रश्नात म्हणजे स्वनिर्धारासाठी चाललेल्या लढयात कोळीवाडा अग्रभागी आहे. पिढयानपिढया शासनाकडून आणि सामाजिक संस्थांकडून संपूर्णपणे दुर्लक्षिले गेल्यानंतर आता इथले रहिवासी आपल्या सभोवतालच्या वस्तीचा त्यांना हवा आहे तसा विकास करण्याच्या हक्काची मागणी करीत आहेत. नाहीतरी पोर्तुगीजांनी मुंबईला बॉम्बे म्हणण्याच्याही पूर्वीपासून कोळीवाडा अस्तित्वात होताच.

कोळीवाड्याचे रहिवासी संपूर्ण जगभरातल्या आर्किटेक्ट्सना, नगरनियोजकांना, समाजशास्त्रज्ञांना, अर्थतज्ज्ञांना, कृतिशील चळवळ्यांना, कलाकारांना, संगीतकारांना आणि इतर प्रतिभावंतांना एकत्र येऊन त्यांच्या भोवतालच्या वस्तीच्या आणि समाजाच्या भवितव्याविषयी त्यांच्याबरोबर सखोल चर्चा करण्यासाठी आमंत्रण देत आहेत.